मुकादगुड्यात दारूबंदी आणि व्यसनमुक्ती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवरील वादग्रस्त मुकादगुडा गावात दारूबंदी आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जिवती पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत एक विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेला गावातील महिला, पुरुष आणि तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
ठाणेदार प्रवीण जाधव यांनी सभेत उपस्थितांना दारू आणि इतर व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “दारू आणि व्यसनांमुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर कुटुंब आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. व्यसनमुक्ती हा गावाच्या विकासाचा पाया आहे.” त्यांनी गावकऱ्यांना दारूबंदी कायम ठेवण्यासाठी आणि तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सभेत गावातील महिलांनी दारूबंदीला पाठिंबा दर्शवत गावात अवैध दारूविक्री रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली. तरुणांनीही व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला.