ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्घटना : निलजाई खाण परिसरात ओबी कोसळून खळबळ

स्कॉर्पिओ व ट्रक दबले

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर (घुग्घुस) : परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. वेकोली वणी क्षेत्रातील निलजाई खाण परिसरात ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली आणि अचानक ओबी (ओव्हर बर्डन) टाकी कोसळली. क्षणातच मातीचा डोंगर एवढ्या वेगाने रस्त्यावर आला की, त्यातून जात असलेली एक स्कॉर्पिओ आणि १८ चाकी ट्रक पूर्णपणे मातीखाली दबल्या.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अपघाताचे दृश्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

चार युवकांचे प्राण वाचले

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमध्ये बसलेले चार युवक मागच्या दरवाजातून कसाबसा बाहेर पडले आणि त्यांनी जीव वाचवला. हे सर्व युवक उकनी गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांची गाडी पूर्णपणे मातीखाली दबल्याची माहिती आहे. तसेच, वंदना ट्रान्सपोर्टचा १८ चाकी ट्रकही मलब्यात गाडला गेला.

रस्ता ठप्प, कामगारांना दुसऱ्या मार्गे पाठवले

अपघातानंतर निलजाई-घुग्घुस मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. दुसऱ्या पाळीला खाणीत पोहोचलेल्या वेकोली कामगारांना व्यवस्थापनाने दुसऱ्या मार्गाने मॅनपॉवर बसद्वारे घरी पाठवले. सध्या या मार्गावर वाहतूक ठप्प आहे.

राहतकार्य सुरू, पावसामुळे अडथळे

वेकोली व्यवस्थापनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले आहे. जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेला मातीचा डोंगर हटवण्याचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरात लवकर मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र सततच्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.

सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेने पुन्हा एकदा पावसाळ्यात खाण परिसरातील सुरक्षा उपाय किती आवश्यक आहेत, हे स्पष्ट केले आहे. सुदैवाने स्कॉर्पिओमधील युवक वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली, अन्यथा गंभीर अपघात घडू शकला असता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये