जिवतीत गोवंश तस्करी प्रकरणी तिघांवर गुन्हा; वाहन, बैल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीच्या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून (क्रमांक MH 34 BZ 8428) तीन बैलांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहन आणि बैल जप्त करण्यात आले आहेत.
जिवती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११५/२०२५ अंतर्गत प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड) आणि महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ)(ब) आणि ९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणेदार प्रविण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या सूचनांनुसार पुढील कारवाई सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणेदार प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वणी (बु.) येथून परमडोलीकडे जाणाऱ्या संशयास्पद पिकअप वाहनाला पेट्रोलिंगदरम्यान थांबवले. पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पंधरे, पोलीस अंमलदार जगदीश मुंडे, अतुल कानवटे, किरण वाठोरे, ज्ञानेश्वर डोकळे आणि महिला पोलीस अंमलदार रजनी निखाडे यांचा समावेश होता. वाहन तपासणीत डाल्यात तीन बैल बांधलेल्या अवस्थेत आढळले, मात्र चालकाकडे वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती.पोलिसांनी वाहनचालक प्रभोद बंडू सातपूते (वय २९, रा. घनोटी (तुकूम), ता. पोंभूर्णा, जि. चंद्रपूर), राजकुमार चतूरदास शेंडे (वय ३२, रा. सातारा कोमटी, ता. पोंभूर्णा, जि. चंद्रपूर) आणि पारस चतूरदास शेंडे (वय ३५, रा. सातारा कोमटी, ता. पोंभूर्णा, जि. चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले. तपासात बैलांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पिकअप वाहन (किंमत ४.५ लाख रुपये) आणि तीन बैल (किंमत ६०,००० रुपये) असा एकूण ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.