डोलारा तलाव ओव्हरफ्लो : प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड
नागरिकांना दिलासा देत शिवसेनेचे मुकेश जिवतोडे धावले मदतीला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील डोलारा प्रभागात डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरले. परिणामी अन्नधान्य, घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.
दरवर्षी तलाव ओव्हरफ्लो टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून मोटार पंपाची व्यवस्था केली जाते. मात्र, यावर्षी नागरिकांनी वारंवार निवेदन करूनही आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे या भागातील कुटुंबे पाण्याखाली गेली. याच दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोणतीही तत्काळ कार्यवाही न झाल्याची तक्रार नागरिकांनी केली.
परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना पक्षाचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिल्याने मोटार पंपाद्वारे तलावातील पाणी उपसा करण्याची व्यवस्था सुरू झाली. या तातडीच्या मदतीमुळे स्थानिकांना थोडा दिलासा मिळाला.
नागरिकांनी प्रशासनावरील नाराजी व्यक्त करतानाच जिवतोडे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जिवतोडे यांनी तहसीलदारांना नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत देण्याची मागणी केली तसेच हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही आवाहन केले.
या प्रसंगी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक पप्पू सारवण, माजी नगरसेवक चंदू खारकर, प्रतिभा सोनटक्के, प्रमोद गेडाम, युवासेना माजी उपजिल्हाप्रमुख महेश जिवतोडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.