ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश मंडळांच्या वतीने यंदा गणेशोत्सवात भाविकांना होणार सोमनाथ मंदिराचे दर्शन
गणेशोत्सवाला अभिनेत्री रिंकु राजगुरू उर्फ आर्ची, गायक मोहम्मद दानिश, रिया भट्टाचार्य राहणार उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार असुन सर्वत्र धाम धूम सुरू असणार आहे. अशातच संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ब्रम्हपूरी शहरातील गणेशोत्सव देखील तितकाच लोकप्रिय आहे. या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली असून गणेशोत्सवात मोठा सामाजिक सलोखा बघायला मिळते.
या परंपरेला कायम ठेवत माजी मंत्री, विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील २ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रम्हपूरीचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी देखील मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असून यावर्षी या मंडळाच्या वतीने गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या प्रतिकृतीचे साक्षात दर्शन होणार आहे. सोमनाथ मंदिर हे गुजरात मधील प्रभास पाटण,वेरावळ स्थित एक मंदिर आहे. हे शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहीले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मात्र विशेष. मागील वर्षी या मंडळाच्या वतीने अयोध्या स्थित राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
यावर्षी गणेशोत्सवादरम्यान विविध प्रकारचे सांस्कृतिक, सामाजिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून गणेशोत्सवाला रुपेरी पडद्यावरील कलाकारांची उपस्थिती लागणार आहे हे मात्र विशेष. मंडळाच्या वतीने २७ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील १० दिवस कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
गुजरात येथील सोमनाथ मंदिराची प्रतिकृती विशेष आकर्षण
यंदा ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गुजरात येथील सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली असून याठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यानंतर सोमनाथ मंदिराचे साक्षात दर्शन होणार आहे. मंदिरात १५ फुट उंच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोबतच याठिकाणी मिनी बाजार (मेला) यामध्ये विविधांगी झुले,पाळणे राहणार असून सांस्कृतिक, सामाजिक, जनजागृतीपर कार्यक्रमांची मोठी मेजवानी भेटणार आहे. त्यामुळे विदर्भातून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थिती दर्शविणार असल्याचे सांगितले जात आहे.
कार्यक्रमावली
२७ आॅगस्ट रोजी सायं. ६ वाजता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना, ३१ आॅगस्ट रोजी सायं. ६ वाजता दहीहंडी उत्सव, १ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता जागर लोककलेचा कार्यक्रम, २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता “संतान नाटक”, ३ सप्टेंबर रोजी सायं.४ वाजता रिल्स स्पर्धा, रात्री ८ वाजता डान्स महासंग्राम, ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण, रात्री ८ वाजता “टाकलेलं पोरं नाटक”, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता वादविवाद स्पर्धा, सायं ७ वाजता हाऊजी खेळ यावेळी सैराट चित्रपट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरू उर्फ आर्ची उपस्थित राहणार आहे, रात्री ९ वाजता ताडोबातील बर्डमॅन सुमेद वाघमारे यांचा वन्यजीव विषयक कार्यक्रम, ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता इंडियन आयडॉल फेम सुप्रसिध्द गायक मोहम्मद दानीश व सारेगामापा फेम रिया भटाचार्य यांचा लाईव्ह सिंगींग शो, रात्री ११ वाजता गोपालकाला, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ढोलताशांच्या पथकासह बाप्पाची मिरवणूक व विसर्जन पार पडणार आहे.