बाप्पांच्या आगमनाची भक्तांना ओढ तर मूर्तिकार रात्रंदिवस बाप्पांच्या मूर्तीला आकार देण्यात दंग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण राज्यात श्री गणेश भक्तांना बाप्पांच्या आगमनाची ओढ लागली असून बाप्पांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू असताना बाप्पांना घडविणारे मूर्तिकार हे सुद्धा रात्रंदिवस एक करून श्रींच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्यात सगळीकडे संततधार पावसामुळे बाप्पांना तयार करण्यासाठी केमिकल युक्त रंगाचा वापर होत असल्याने ढगाळ वातावरणामुळे तो सुकण्यास बराच वेळ जात आहे ,वेळप्रसंगी आधुनिक यंत्राच्या साह्याने रंग सुकण्याचे काम सुरू आहे शहरातील गिरोली वेशी मध्ये गेल्या 50 वर्षापासून या क्षेत्रात काम करणारे मूर्तिकार हरिभाऊ यमाजी पंडित व त्यांचा संपूर्ण परिवार हे गेल्या दोन महिन्यापासून बाप्पांना घडवण्यामध्ये दंग आहेत या ठिकाणी सहा फूट उंचीपर्यंतच्या बाप्पांच्या मुर्त्या तयार करण्याचे काम सुरू आहे.
या परिवारास लाभलेल्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत असून केवळ उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही हा व्यवसाय करतो असे त्यांनी सांगितले यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या तयार करण्यासाठी कोणताही अडथळा न आल्याने आम्ही व आमचा परिवार बाप्पांच्या आगमनावर खुश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.