धक्कादायक _ इंग्रजीमध्ये स्कूल लिहिता आलं नाही म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
मारकुट्या शिक्षकावर त्वरित कारवाई होणे आवश्यक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील जिल्हा परिषद शाळेत हा भयानक प्रकार घडला आहे. केवळ स्कूल या शब्दाची स्पेलिंग आली नाही म्हणून पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना दि. १९ ऑगस्ट २०२५ मंगळवारला घडली. ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मांगली गावातील जिल्हा परिषद शाळेत अमानुष मारहाण झालेला तो मुलगा पहिल्या वर्गात शिकतो. काही महिन्यांपूर्वीच त्याने शाळेची पायरी चढली. मात्र त्या मुलासह आठ ते दहा मुलांना शिक्षकांनी विचारलेली स्कूल ची स्पेलिंग सांगता आली नाही, म्हणून त्या शिक्षकांनी त्या मुलासह अन्य विद्यार्थ्यांना मारहाण केली. शिक्षकाच्या भितीमुळे मुलांनी सदर घटना पालकांना सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी २० ऑगस्ट २०२५ बुधवारला सदर घटना उघडकीस आली. यात त्या अमानुष मारहाण झालेल्या मुलाच्या पाठीवर बरेच व्रण उमटले आहेत. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा मारकुट्या शिक्षकावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे.
सदर प्रकरण दाबण्यासाठी ‘त्या’ शिक्षकाकडून आर्थिक बळाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याची चर्चा ब्रम्हपुरी तालुक्यात रंगत आहे. परंतु गावातील पालकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. शिक्षकाने विद्यार्थ्याला केले मारहाणीचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर शिक्षकावर उचीत कारवाई करण्याची मागणी सुज्ञ पालक करीत आहेत.
‘त्या’ शिक्षकावर उचीत कारवाई होणार
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी आश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या आदेशानुसार, गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे हे सदर प्रकरणाची प्रत्यक्ष सखोल चौकशी करणार असून तसा अहवाल आश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर सदर शिक्षकावर उचीत कारवाई होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे यांनी प्रतिनिधीला दिली.