ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यात जुलै महिन्याचे धान्य वितरण रखडले

शिधापत्रिकाधारकांना हक्काच्या धान्याची प्रतीक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील गडचांदूर विभागातील जवळपास 12 गावांतील शिधापत्रिकाधारकांना अद्याप जुलै महिन्याचे धान्य मिळालेले नाही. आवारपूर, कढोली, सोनुर्ली, लखमापूर, बिबी, नोकारी आदी गावांमध्ये ही समस्या जाणवत असून शिधापत्रिकाधारकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

संबंधित गावांतील काही रेशन दुकानदारांनी सांगितले की, जुलै महिन्यातील धान्य वेळेवर दुकानदारांकडे पोहोचले नाही. त्यातच ऑगस्ट महिना सुरू झाल्याने e-POS मशीनवरील डाटा बदलल्यामुळे जुलै महिन्याचे वितरण करता आले नाही. परिणामी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

दरम्यान, शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यांचे धान्य एकत्रितपणे देण्याची घोषणा केली होती. मात्र कोरपना तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. कोरपना गोदामावरून रेशन दुकानदारांकडे धान्य वेळेत पोहोचले नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

धान्य वेळेवर मिळाले नाही, यामुळे गोरगरीब व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठा विभागाने लक्ष घालून ज्या कुटुंबांना जुलै महिन्याचे धान्य मिळाले नाही, त्यांना लवकरात लवकर धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शिधापत्रिकाधारकांनी व्यक्त केली आहे.

माहे जुलैचा डाटा e-POS प्रणालीवर सुरू करावा, याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे पत्र पाठविण्यात आले आहे. जुलै महिन्याचा डाटा सुरू करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचा पुरवठा विभागाचा ठाम मानस आहे.

कोणताही कार्डधारक आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

– विक्की देवघरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, कोरपना

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये