ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील शेतमालाच्या नुकसानीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : गत आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. याबाबत राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. तसेच नुकसानग्रस्त शेतमालाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. सोबतच वर्धा, वैनगंगा, पैनगंगा नद्या दुधडी भरून वाहत असून इतर जिल्ह्यातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज जिल्हाधिका-यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 130 गावांना पुराचा फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार 1378 हेक्टर क्षेत्रावर शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात धान 80 हेक्टर, कापूस 1139 हेक्टर, सोयाबीन 135 हेक्टर, तूर 8 हेक्टर, भाजीपाल्याचे 15 हेक्टर वर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त बाधित एकूण शेतक-यांची संख्या 4038 आहे. पंचनामे झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढू शकतो, असे कृषी विभागाने कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये