काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसकडून पोलिसात निवेदन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तन कार्यक्रमात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” असे विधान करून बाळासाहेब थोरात यांच्यावर उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनीष तिवारी, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, नौशाद शेख, अख्तर सिद्धिकी, प्रसन्ना सिरवार, काशिफ अली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण असून या संप्रदायाने नेहमीच समाजाला एकतेचा आणि कल्याणाचा संदेश दिला आहे. मात्र काही समाजविघातक प्रवृत्ती राजकीय फायद्यासाठी या संप्रदायाचा वापर करत आहेत. अशा प्रवृत्तींना सरकारने आळा घालणे अत्यावश्यक आहे. काँग्रेसने पोलिस प्रशासनाला तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.