ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वणी मार्गावरील खड्ड्यांमुळे बसफेऱ्या ठप्प

बारा फेऱ्या तात्पुरत्या बंद; प्रवाशांचे हाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – कोरपना ते वणी या मार्गावरील शिरपूर ते वेळाबाई फाटा दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ लागला होता. रस्त्यावरील प्रचंड खड्डे, उखडलेला डांबर व पावसामुळे झालेले पाणी साचल्याने बस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी वणी आगार प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील बारा बसफेऱ्या तात्पुरत्या बंद केल्याचे जाहीर केले.

आगार प्रमुख लता मुळेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रस्ता वाहतुकीस योग्य झाल्याची खात्री होईपर्यंत आणि बांधकाम विभागाकडून रस्ता सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत बसफेऱ्या सुरू करता येणार नाहीत,” असे सांगण्यात आले.

या निर्णयाचा फटका शालेय विद्यार्थी, शासकीय व खाजगी कर्मचारी तसेच दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता नागरिकांना प्रवासासाठी स्वतःची दुचाकी, चारचाकी वा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खर्च वाढून त्रास अधिकच वाढला आहे.

बसफेऱ्या बंद झाल्याने कोरपना – वणी, गडचांदूर तसेच शिंदोला या महत्त्वाच्या फेऱ्या ठप्प झाल्या आहेत. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून फेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या दुर्दशेच्या रस्त्याची जबाबदारी बांधकाम विभागाकडे असल्याने आता त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांनीही संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करून बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये