एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस हे ग्रामीण मुलींच्या सक्षमीकरणाचे केंद्र – कुलगुरू प्रा.डॉ. उज्वला चक्रदेव
एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवाराच्या ‘प्रगती पुस्तकाचे’ विमोचन

चांदा ब्लास्ट
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर (एसएनडीटी महिला विद्यापीठाचे बल्लारपूर आवार) च्या दोन वर्षांच्या प्रगतीची वाटचाल दाखविणाऱ्या “प्रगती पुस्तकाचे” विमोचन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते बल्लारपूर आवार येथील कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कुलगुरू दोन दिवसीय दौऱ्याकरिता बल्लारपूर येथे आल्या होत्या. कार्यक्रमाला आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सन्मित्र सैनिक शाळेच्या प्राचार्या सौ. अरुंधती कावडकर, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विमोचन कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव म्हणाल्या की, “ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलींसाठी हे कॅम्पस म्हणजे ज्ञान, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाचे दार आहे. या प्रगती पुस्तकातून केवळ घडामोडींचा आलेख नाही तर या कॅम्पसची आत्मकथा पुढे येते. समाजातील सर्व घटकांनी हातभार लावल्यास हा कॅम्पस ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात नवा अध्याय घडवेल.” सोबतच या कॅम्पसच्या निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवर यांचे आभार मानले. त्यांच्या मुळेच या भागातील मुलींना उच्च शिक्षणाची दिशा प्राप्त होईल व महिला शिक्षणाची वाटचाल सुकर होईल.
संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी या प्रसंगी आवाराच्या प्रगतीची वाटचाल आपल्या भाषणातून विशद केली. त्यांनी अधोरेखित केले की, अल्पावधीतच कॅम्पसने शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि भौतिक सुविधांच्या दृष्टीने उल्लेखनीय पावले उचलली आहेत.
‘प्रगती पुस्तकाची’ मुख्य संकल्पना आणि संपादन सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी केले आहे. प्रास्ताविक करताना त्यांनी सांगितले की, या कॅम्पसला दोन वर्षे पूर्ण झाली. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने या कॅम्पस ची वाटचाल सुरू आहे. या पुस्तकात दोन वर्षांतील शैक्षणिक प्रगती, विविध विभागांची कामगिरी, विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेचा आलेख, रोजगाराभिमुख प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर विकास, विद्यार्थिनींचे मनोगत तसेच स्थानिक समाजाशी असलेले संवाद यांचे समर्पक दस्तावेजीकरण करण्यात आले आहे. “हे प्रगती पुस्तक म्हणजे केवळ वार्षिक अहवाल नसून, कॅम्पसच्या भविष्यदर्शी वाटचालीचे दर्पण आहे,” असे ते म्हणाले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी वाणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी मानले.