मनपातर्फे 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त!

चांदा ब्लास्ट
महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येत असुन बाजार वॉर्ड,जैन मंदिर जवळील105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.
भरत अल्लेवार यांच्या मालकीची ही इमारत असुन त्यांना सदर इमारत पाडण्याची नोटीस मनपातर्फे देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वतः काही हालचाल न केल्याने मनपाने कारवाई करून त्यांच्या इमारतीचा जीर्ण झालेला भाग निष्कासित केला आहे. पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते; मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. उपायुक्त संदीप चिद्रावार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,नगर रचनाकार प्रतीक देवतळे,अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.