पुडियाल मोहदा येथील शेतकऱ्याच्या बैलांचा सर्पदंशाने मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
तालुक्यातील पुडियाल मोहदा येथील शेतकरी दत्ता गोरोबा चौकटे यांच्या बैलांचा सोमवारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. ऐन हंगामात बैल गमावल्याने शेतकऱ्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दत्ता चौकटे यांनी आपले बैल गावातील शेतात चारण्यासाठी बांधले होते. यावेळी सर्पदंशामुळे बैलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागाला कळविताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, बैलांचा मृत्यू हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.ऐन शेतीच्या हंगामात बैल गमावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दत्ता चौकटे यांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
पशुसंवर्धन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्याला तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनीही केली आहे.