श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चंद्रपुरात भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : अहीर गवळी युवक संघटना व अहीर गवळी समाज बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 16 ऑगस्ट, 2025 रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त चंद्रपूर शहरातून भव्य शोभायात्रा काढून जन्माष्टमी साजरी केली. सदर शोभायात्रा बालाजी वार्डातील श्री हनूमान आखाडा गवळीपुरा चौक येथून बाळकृष्णाच्या मुर्तीसह सजलेल्या पालखीतून काढण्यात आली. ही शोभायात्रा गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे कस्तुरबा चौकातुन पुन्हा हनुमान आखाडा येथे विसर्जित करण्यात आली.
या शोभायात्रेचे शहरातील अनेक प्रतिष्ठान व नागरिकांनी स्वागत केले. बाळकृष्णाच्या मुर्तीचे पुजन करुन आशीर्वाद घेतले. या शोभायात्रेमध्ये समाजाचे भुषण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर सहभागी झाले. श्रीकृष्ण पालखीचे विधीवत पुजन करून त्यांनी सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या शोभायात्रेत भागवताचार्य श्री मनिषभाईजी महाराज यांनी सहभागी होवून पालखीचे वहन केले.
शोभायात्रेमध्ये सर्वश्री हरीभैय्या अहीर, अहीर समाजाचे अध्यक्ष बबन बाकरवाले, चंद्रपूर कृ.उ.बा.समितीचे संचालक दयानंद बंकुवाले, जगदीश दंडेले यांचेसह युवक, युवती व समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती. शोभायात्रेत भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारीत विविध दृष्ये सादर करण्यात आली. शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर गोपाळकाला (महाप्रसाद) कार्यक्रम पार पडला.