घुग्घुसात मतदार याद्यांवरील भोंगळ कारभारावरून काँग्रेसचा भाजपाला खुला चुनौतीसत्र

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार झाल्याचा आरोप पुराव्यासह केल्यानंतर घुग्घुस काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनीही चंद्रपूर ग्रामीण विधानसभा व घुग्घुस शहराच्या मतदार याद्यांची तपासणी केली. यात केमिकल वॉर्ड क्र. 06 मधील घर क्रमांक 350 वर तब्बल 119 मतदारांची नावे नोंद झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेऊन मोठा भंडाफोड करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातील माध्यमांचे लक्ष घुग्घुसकडे वेधले गेले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे शहराध्यक्ष यांनी फेसबुकवर पोस्ट करून, “निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक आहे. घराघरांत जाऊन तपासणी करूनच मतदारांची नावे नोंदविली जातात. काँग्रेस भ्रामक माहिती पसरवून नागरिकांची दिशाभूल करत आहे,” असे म्हटले.
भाजपाचे शहराध्यक्ष यांच्या या पोस्टला प्रत्युत्तर देत काँग्रेसचे शहराध्यक्ष राजुरेड्डी व सैय्यद अनवर यांनी त्यांना 15 ऑगस्ट रोजी गांधी चौक, घुग्घुस येथे येऊन सत्य सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यानुसार काँग्रेस नेते सकाळी 10:30 वाजल्यापासून मतदार याद्या घेऊन गांधी चौकात ठाण मांडून बसले. या आंदोलनाला काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल नरुले यांनीही हजेरी लावली.
मात्र भाजपाचे शहराध्यक्ष तसेच त्यांचे कोणतेही पदाधिकारी वा कार्यकर्ते गांधी चौकात न आल्याने भाजपाचे दावे कथित ठरल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
या प्रसंगी काँग्रेसचे सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, शहर महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
या घडामोडींमुळे घुग्घुस शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.