जिवती पोलिसांची अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती शहरात अवैध दारू विक्रीच्या विरोधात जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण जाधव यांनी ‘सिंघम’ स्टाईलने’ धडक कारवाई करत अवैध धंद्यांना चांगलाच दणका दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मूम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.
जिवती पोलिस स्टेशनच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, जिवती पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध हातभट्टी मोहा दारू विक्री करणाऱ्या सहा इसमांवर कायदेशीर कारवाई केली.
या कारवाईत एकूण १५,०५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त केलेल्या मुद्देमालाचे सँपल (सीए) घेण्यात आले असून, उर्वरित अवैध दारू गावाबाहेरील नाल्यात नष्ट करण्यात आली. या प्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ठाणेदार सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिवती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या कारवाईमुळे जिवती परिसरात दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिवती पोलीस स्टेशनच्या या कारवाईने प्रशासनाच्या कठोर भूमिकेचा प्रत्यय दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले असून, अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने होण्याची मागणी केली आहे.