ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात!

हातगाडी व्यावसायिकांनी रस्ता गिळंकृत केल्याने वाहतुकीस अडथळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- शहरातील पोलीस स्टेशन ते वीर बाबुराव शेडमाके चौक पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने अनधिकृत रित्या हातगाड्या व स्थानिक व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.त्यामुळे शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात आल्याने येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, परंतु नगर पंचायत चे अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प असल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांना पायी प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याच रस्त्याचे मागील वर्षी लाखो रुपये खर्च करून काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण केले आहे. रुंदीकरणा नंतर काही काळ या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता मात्र त्यानंतर या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर हातगाडी वाले,फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच अनेक दुकानदारांचे साहित्य,पान ठेले आणि छोटी मोठी दुकाने आदी व्यावसायिकांनी रस्त्याच्या पदपथावर अतिक्रमण केले आहे त्यामुळे रस्ता वाहतुकीस अपुरा पडत आहे त्यामुळे परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

तसेच या मुख्य रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यावरच नगर पंचायतचे अतिक्रमण विभाग कारवाई करणार का? असा प्रश्न यावेळी नागरिक विचारत आहेत. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे सध्या लहान- मोठे अपघात घडत आहेत परंतु नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने रस्ता मोठा होऊनही ही स्थिती येथे पहावयास मिळत आहे,त्यामुळे नगर प्रशासन व क्षेत्रीय कार्यालय यांनी येथील अतिक्रमण हटवून येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

स्थानिक व्यावसायिकांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी वाहने पार्क करण्यासाठी जागाच ठेवली नाही उलट आपली दुकाने रस्त्याच्या पदपथावर थाटली आहेत त्यामुळे ग्राहक रस्त्यातच वाहने पार्क करून खरेदीसाठी जात आहेत त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे परंतु याकडे वाहतूक नियंत्रक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांचे चांगलेच फावत

आहे. नगर पंचायत अतिक्रमण विरोध पथकाची हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेत असल्याने यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही त्यामुळे रस्ता अरुंद होत आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

स्थानिक पातळीवरील अतिक्रमण हटविण्याबाबत नगर पंचायत कार्यालयाला मोठे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे नगर पंचायत कार्यालयाने विविध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिवती शहरातील मुख्य रस्ता मोकळा करण्यासाठी तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये