महाआरोग्य शिबिरातून पहिल्या टप्यात सहा बालके मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना
आ. जोरगेवार यांच्या पुढाकारातून होणार निशुल्क उपचार

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित महाआरोग्य शिबिराचा एक हृदयस्पर्शी आणि जीवनदायी टप्पा आज साकारला. या शिबिरातून हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एकूण सहा बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. ही सर्व बालके चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांचे वय आठ वर्षांखालील आहे.
यामध्ये केवळ पाच महिन्यांचे अक्षु शेंद्रे याचाही समावेश आहे. सर्व बालकांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून जुपिटर हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढई, रॉबिन बिश्वास, राकेश बोमनवार, सुमित बेले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व बालकांवर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे. बालकांना रवाना करण्याच्या या भावनिक क्षणी पालकांच्या डोळ्यात दिलासा आणि आनंदाश्रूंनी भरलेला होता.
आ. जोरगेवार यांच्या सामाजिक उपक्रमातून सुरू झालेल्या या महाआरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना मोफत तपासणी, औषधे आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा मिळत आहे. अशा वैद्यकीय उपक्रमांना पुढे अधिक व्यापक स्वरूप दिले जाणार असून, कोणीही आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये ही आपली भूमिका असून हीच खरी आपली ध्येयपूर्ती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.