ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कलेक्टर सीईओंनी घेतला अवयवदानाचा निर्णय ; बैठकीतच केली ऑनलाईन नोंदणी

जिल्हाभरात २११४ जणांनी घेतली अवयवदानाची प्रतिज्ञा

चांदा ब्लास्ट

शासनाच्या सुचनेनुसार संपूर्ण राज्यात ३ ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अवयवदान ही आजच्या काळातील सर्वात मोठी मानवसेवा असून ती अनेकांना जीवनदान देऊ शकते. याच संकल्पनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मा.सां. कन्नमवार शास. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, अवयवदानाबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती द्यावी. या मोहिमेदरम्यान अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्यात येणार आहे. आपण असतांना आणि नसतांनाही समाजाच्या उपयोगी पडू शकतो. ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आरोग्य विभागाची संपर्क करावा. तसेच आपले नातेवाईक व आजुबाजूच्या लोकांना अवयवदानाविषयी प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.

 जिल्हाभरात या मोहिमेदरम्यान आतापर्यंत २११४ अवयवदानाची ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली आहे. यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे १६५९ तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ४५५ जणांचा समावेश आहे.

अवयवदानाची पात्रता : सर्व वयोगटातील निरोगी व्यक्ती अवयवदान करू शकतात. ब्रेन स्टेम, तीव्र हृदयविकाराचा झटका तसेच अकस्मिक कारणाने झालेला मृत्यु, इत्यादी कारणाने मृत्यु झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करता येते. ज्या व्यक्तिंचा मृत्यु हा रेबीज, एचआयव्ही, हिपॅटॉयटीस, बुडून मृत्यु होणे, कर्करोग व सेप्टीक व्यक्तींचे अवयवदान करता येत नाही.

अवयवदान करण्याची इच्छा असल्यास : एखाद्या व्यक्तीस मृत्युनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. तसेच संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या नातेवाईकाची सही सुध्दा आवश्यक आहे. हा फॉर्म भरल्यानंतर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल. जरी डोनर कॉर्डवर सही असली तरी मृत्युनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या संमतीशिवाय अवयव दान होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.

येथे भरा अवयवदानाचे संमतीपत्र : शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार https://notto.abdm.gov.in या संकेतस्थळावर अवयवदानाची संमती देऊन आपण प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतो.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये