ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तयार होणारी अभ्यासिका मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार – आ. जोरगेवार

कृष्णा नगर येथील अभ्यासिका बांधकामाचे भुमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते

चांदा ब्लास्ट

श्री. रामकृष्ण सेवा समितीने हाती घेतलेले हे स्वप्नवत कार्य आज पहिल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आपल्या परिसरात अभ्यासिका उभारण्याचा शुभारंभ होत आहे. ही केवळ चार भिंतींची इमारत नसून, आपल्या मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी कृष्णा नगर येथील श्री श्री रामकृष्ण सेवा समिती येथे अभ्यासिकेच्या बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर कामाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पॉल, सविता दंढारे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडाणी, मंडळ अध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, सचिव विश्वजीत शाहा, रॉबिन बिश्वास, तपोष डे, प्रलय सरकार, आनंद रणशूर, सुधाकर राखडे, जितेश कूळमेथे, कृष्णा मंडळ, बलाई चक्रवर्ती, मदन शहा, संतोष चक्रवर्ती, सुशांत भद्रा, सुनील रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प आपण केला आहे. ११ अभ्यासिकांचा आपला संकल्प होता; मात्र आता जवळपास २० अभ्यासिका आपण मतदारसंघात तयार करत आहोत. यातील काही अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले असून, विद्यार्थी येथे अभ्यास करून स्वप्नांना पंख देत आहेत, असे ते म्हणाले.

ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तक वाचण्याची किंवा अभ्यास करण्याची जागा नसेल, तर त्यांच्या विचारशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि स्वप्नांचा विस्तार करणारे केंद्र ठरेल. येथे होणाऱ्या वाचन-संवादातून, मार्गदर्शन सत्रांतून आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतून अनेक तरुणाई आपले उद्दिष्ट पूर्ण करतील. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक हेही या अभ्यासिकेचे ध्येय असेल. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आणि प्रत्यक्ष संवादाची गरज अधिक वाढली आहे. अशा वेळी, अशी सुविधा निर्माण होणे म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये