ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलांच्या आधार कार्डवर लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे दोन्ही नावांची नोंद करा

खा. धानोरकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शासकीय किंवा निमशासकीय कामकाजात महिलांना लग्नानंतर कागदपत्रामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. परिणामी त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. ही समस्या दूर करण्याकरिता महिलांच्या आधार कार्डवर लग्नापूर्वीचे (वडिलांचे ) आणि लग्नानंतरचे (पतीचे ) दोन्ही नावे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.

             सध्याच्या नियमांनुसार, आधार कार्डवर फक्त एकच नाव नोंदवता येते. त्यामुळे, लग्नानंतर महिलांना त्यांच्या माहेरचे आडनाव सोडून पतीचे आडनाव लावावे लागते. या प्रक्रियेमुळे अनेक प्रशासकीय आणि भावनिक समस्या निर्माण होत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले की, अनेक महिलांचे शैक्षणिक दस्तऐवज, पदवी प्रमाणपत्र, जुने बँक खाते आणि मालमत्तेची कागदपत्रे त्यांच्या लग्नापूर्वीच्या नावावर असतात, ज्यामुळे आधार कार्डवरील नावाशी ते जुळत नाही. या विसंगतीमुळे त्यांना विविध सरकारी आणि खाजगी कामांमध्ये अडचणी येतात.

याव्यतिरिक्त, सांस्कृतिक आणि भावनिक कारणांमुळे अनेक महिलांना त्यांच्या वडिलांचे आडनाव कायम ठेवायचे असते, परंतु आधार कार्डवर ही सुविधा नसल्यामुळे त्यांना आपली एक ओळख सोडावी लागते. या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसा वाया जातो, तसेच अनावश्यक कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पॅन कार्डचे उदाहरण दिले, जिथे वडिलांचे आणि लग्नानंतरचे असे दोन्ही नावे नोंदवण्याची सोय आहे. त्यामुळे महिलांची दोन्ही ओळख सुरक्षित राहते. त्याचप्रमाणे, आधार कार्डवरही ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास महिलांना त्यांची ओळख जपण्याचा हक्क मिळेल, विविध कागदपत्रांमध्ये एकसारखेपणा येईल आणि प्रशासकीय अडचणी कमी होतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्र्यांना या महत्त्वाच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये