“मानसिक आरोग्य जागरूकता सत्र” चंद्रपूर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
अधिकारी-कर्मचारी वर्गामध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि त्यांना सकारात्मक ऊर्जा देणे या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे 7 ऑगस्ट रोजी राणी हिराई सभागृहात “मानसिक आरोग्य जागरूकता सत्र” आयोजित करण्यात आले होते.. या सत्राचे आयोजन “आर्ट ऑफ लिव्हिंग” या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानवतावादी व शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या सत्रात दैनंदिन ताणतणाव, चिंता, नैराश्य आणि मानसिक थकव्यावर मात करण्यासाठी योग, श्वसन तंत्र, ध्यान, आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे यावर सत्रात विशेष भर देण्यात आला.
श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली “आर्ट ऑफ लिव्हिंग” संस्था तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने जगभरात 180 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. या संस्थेच्या प्रशिक्षित मार्गदर्शकांमार्फत देशभरात विविध संस्थांमध्ये “मानसिक आरोग्य जागरूकता सत्र” घेतले जात आहेत. हा उपक्रम राष्ट्रीय जनजागृती अभियानाचा एक भाग आहे.
कार्यक्रमात “आर्ट ऑफ लिव्हिंग” संस्थेच्या प्रशिक्षित प्रतिनिधींनी विविध प्रात्यक्षिके घेतली. उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सत्रानंतर सकारात्मक अभिप्रायही व्यक्त केला. या उपक्रमाचा उद्देश महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे, कार्यक्षमतेत वाढ करणे व तणावमुक्त वातावरण निर्माण करणे हा होता.