“स्तनपान सप्ताह” जनजागृती कार्यक्रम
स्त्री रोग व प्रसूती रोग तज्ञ संघटना, चंद्रपूर शाखेचा उपक्रम

चांदा ब्लास्ट
स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि मातांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, स्त्री रोग व प्रसूती रोग तज्ञ संघटना, चंद्रपूर शाखेतर्फे “स्तनपान सप्ताह” अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील प्रसूती पश्चात वार्डामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.
या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. कल्पना गुलवाडे (अध्यक्ष), डॉ. ऋचा पोडे (सचिव) आणि डॉ. श्वेता मानवटकर (कोषाध्यक्ष) यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. कीर्ती साने यांनी स्तनपानाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक फायदे समजावून सांगितले. त्याचबरोबर डॉ. मनीषा घाटे, डॉ. पूनम नगराळे, डॉक्टर शुभांगी वासाडे डॉ. शितल सोनारकर व निवासी डॉक्टर, तसेच नर्सिंग स्टाफने सहभाग घेऊन मातांना मार्गदर्शन केले.
प्रत्येक उपस्थित मातेला स्तनपानाबद्दल संपूर्ण माहिती, योग्य पद्धती, काळजी व फायदे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मातांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.
स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असून, बाळाच्या पोषणासाठी सर्वोत्कृष्ट आणि नैसर्गिक पर्याय आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. या कार्यक्रमाच्या वेळेस स्तनदा मातांना राजगिराचे लाडू आणि पौष्टिक आहार याचे वाटप करण्यात आले
प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. कल्पना गुलवाडे यांनी केले, तर कोषाध्यक्ष डॉ. श्वेता मानवटकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सिस्टर निकिता लभाने यांनी केले.