आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल डोळ्यात कृतज्ञता अन् मनात आशीर्वाद!
लोकतंत्र सेनानींनी प्रत्यक्ष भेटून दिल्या आ.मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांदा ब्लास्ट
आ. मुनगंटीवार यांना दिली विशेष भेट, प्रसंगाने भारावले
चंद्रपूर – ज्यांनी भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी तुरुंगवास भोगला. संघर्षाच्या काळात कुटुंबापेक्षा ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका घेतली आणि प्रसंगी भूक-तहान विसरून केवळ ‘भारत माता की जय’ हा एकमेव नारा हृदयात कोरून ठेवला. त्या लोकतंत्र सेनानींनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी आज चंद्रपूर गाठले. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आ. मुनगंटीवार यांच्या हातात कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे खाऊ ठेवला. हा हृद्य क्षण अनुभवताना स्वतः आ. मुनगंटीवार देखील भारावून गेले.
आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा आवाज आ. श्री. मुनगंटीवार यांनी विधानसभेत बुलंद केला. त्यांना दरमहा २० हजार रुपये मानधन मिळावे यासाठी संघर्ष केला आणि या संघर्षाला यश मिळाले. या लोकतंत्र सेनानींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघर्षव्रतींनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता तर व्यक्त केलीच. पण वाढदिवसाला प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला.
यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे महासचिव विश्वास कुलकर्णी (जळगाव), प्रदीप ओगले (सांगली), अरुण भिसे व पांडुरंग झिंझुरडे (यवतमाळ) या सर्व लढवय्यांना भेटून मन अंतःकरणापासून भारावून गेले. या निःस्वार्थ सेनानींच्या समर्पणाला माझा शतशः सलाम. त्यांच्या जीवनकार्याला न्याय देण्याची संधी मिळणे, हेच माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने सर्वात मोठं भाग्य समजतो, अशी भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
लोकतंत्र सेनानी यांचा मानधनाचा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे, हे केवळ आ. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले. तसेच आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, त्यामुळेच दरमहा २० हजार रुपये मानधन मिळण्याचा निर्णय पूर्णत्वास आला.आणीबाणीमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पितपणे लढणाऱ्या सेनानींसाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, या शब्दांत लोकतंत्र सेनानी संघाने पुन्हा एकदा आभार व्यक्त केले.