आ. जोरगेवार यांची रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल बनविण्यासाठी शिक्षण मंत्री यांना ५ कोटीची मागणी
विश्राम गृह येथे भेट घेत केली मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील जटपूरा गेट परिसरात स्थित रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. ना. दादाजी भुसे चंद्रपूर दौऱ्यावर असताना, विश्रामगृह येथे आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केले
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते अशोक जिवतोडे, विधानसभा महिला प्रमुख वंदना हातगावकर, प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, नामदेव डाहुले, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुरे, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, रवि जोगी, ॲड. सारिका संदुरकर, देवनंद वाढई, वंदना तिखे, सायली येरणे, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार यांची उपस्थिती होती.
रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा प्रभाग क्र. ७ मध्ये असून, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसाधनांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. सध्या शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, शौचालयांची संख्या कमी आहे, तसेच डिजिटल शिक्षणासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही.
या पार्श्वभूमीवर, सदर शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा देत नव्याने सुसज्ज इमारत, स्मार्ट क्लासरूम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे ५ कोटी निधीची आवश्यकता असुन हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे.