खा. धानोरकर यांच्या ओबीसी समितीकडे विविध मागण्या

चांदा ब्लास्ट
आज ओबीसी समितीची बैठक पार पडली, ज्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर विशेष लक्ष वेधले. यावेळी प्रामुख्याने ओबीसी जनगणना, ओबीसी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसारख्या विषयांवर भर दिला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागणी केली की, ओबीसी समाजाची स्थिती, त्यांच्या विविध समस्या आणि लोकसंख्येची अचूक माहिती मिळवण्यासाठी ओबीसी जनगणना तात्काळ करावी. ही जनगणना योग्य धोरणे तयार करण्यासाठी आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, नोकरी आणि सेवांमध्ये ओबीसी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत समितीने सरकारला शिफारसी कराव्यात असे त्या म्हणाल्या.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वर्ष २०२२-२३ आणि २०२३_२४ या वर्षांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झाली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे, शिष्यवृत्ती योजना तात्काळ सुरू करून प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे मार्गी लावावीत, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, ओबीसींच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीबद्दल विश्वसनीय माहिती गोळा करण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रणाली तयार करावी. तसेच, या माहितीवर आधारित वार्षिक अहवाल तयार करावा, असे त्यांनी सुचवले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, “ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आणि सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकारने या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. समितीने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी.” असे त्यांनी सुचविले आहे.