ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या बॉक्सिंगपटूंचा दणदणीत विजय! राज्य अजिंक्यपद स्पर्धेत झळकले नवे तारे  

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व ऍड हॉक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सब-जुनिअर, कप क्लास व कॅडेट मुलींच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही स्पर्धा ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान शिवछत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे पार पडली.

या स्पर्धेत जिल्हा क्रीडा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र व तालुका क्रीडा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर येथून एकूण २१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण व दमदार खेळ सादर करत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले.

भद्रावतीच्या सिद्धी आमने हिने सुवर्णपदक पटकावून नोएडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे. तर रिषभ रायपुरे याने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होऊन थेट अंतिम फेरीत प्रवेश करत रौप्य पदक पटकावले. आर्ची बासनपल्लीवार, प्रणाली बद्दकल व काजल यादव या खेळाडूंनी कांस्य पदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली. तसेच कृष्णा रोहणे, रिद्धी आमने, अनन्या उरकुडे, केतन जोगी, गंधर्वी राऊत, कावेरी मडावी, समृद्धी बलगरे, कांशित इंदुरकर, सुमेध दहिवले, जय देऊळकर, अथर्व कश्यप, राशी तिवारी, वैष्णवी तिवारी, सारा मुन व विधीका सहारे या खेळाडूंनी राज्यस्तरावर प्रथमच सहभागी होत उत्कृष्ट अनुभव घेत चंद्रपूरचा नवा चेहरा म्हणून आपली छाप सोडली.

या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. राकेश तिवारी, ॲड. मिलिंद रायपुरे, प्रा. संगीता बांबोळे, प्रशिक्षक प्रीती बोरकर, रोहन मोटघरे, पंकज शेंडे, लता तिवारी, खुशाल मांदळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, अमर भंडारवार आदी मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर चंद्रपूरमधील बॉक्सिंगपटूंना अधिक आत्मविश्वास प्राप्त झाला असून, भविष्यात ऑलिम्पिकमध्येही हे खेळाडू चंद्रपूरचे प्रतिनिधित्व करतील, अशी आशा डॉ. राकेश तिवारी यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये