६३ विविध सामाजिक, धार्मिक, आरोग्यवर्धक कार्यक्रमांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह कधी न संपणारी सामाजिक उपक्रमांची मालिका ठरावी - आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट
नागरिकांना थेट लाभ मिळेल असे सामाजिक उपक्रम आपण देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात आयोजित केले आहेत. आज तब्बल ६३ सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला आहे. युवकांसाठी रोजगार मेळावा, वक्तृत्व स्पर्धा यांसारखे उपक्रमदेखील यामध्ये समाविष्ट होते. हा केवळ एक आठवडा न राहता, कधी न संपणारी सामाजिक उपक्रमांची मालिका ठरावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जनकल्याण सेवा सप्ताहा’च्या निमित्ताने चंद्रपूर शहरात आज ६३ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहर व परिसरातील विविध भागांमध्ये सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम पार पडले. या उपक्रमांमुळे शहरात उत्सवाचे आणि सेवा भावनेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
सेवा सप्ताहांतर्गत रक्तदान शिबिरांचे ६ कार्यक्रम, २२ ठिकाणी महाआरती, १७ योग शिबिरे, ६ वृक्षारोपण कार्यक्रम, ३ नोटबुक वाटप, २ फळवाटप उपक्रम, तसेच वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावा व इतर उपक्रम असे एकूण ६३ कार्यक्रम विविध भागांत आयोजित करण्यात आले.
रक्तदान शिबिरांमध्ये शहरातील प्रतिष्ठित संस्था आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. माता महाकाली मंदिर, वढा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंचशील चौक, महादेव मंदिर, जय हिंद चौक, शिवाजी नगर, दुर्गा मंदिर, खंडोबा मंदिर, माता मंदिर अशा विविध धार्मिक स्थळांवर महाआरतीचे कार्यक्रम पार पडले. सकाळी व सायंकाळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी झाले.
योग शिबिरांना महिलांचा विशेष प्रतिसाद मिळाला. सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील विविध ठिकाणी शिबिरांना सुरुवात झाली. प्रशिक्षित योग शिक्षकांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. वॉर्डनिहाय महिला योग शिबिरे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
सरदार पटेल हायस्कूल येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील विविध झोपडपट्ट्या, शाळा, वसाहती व वॉर्डांमध्ये नोटबुक व फळ वाटपाचे उपक्रम पार पडले.
या उपक्रमांपैकी अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, आज संपूर्ण चंद्रपूर मतदारसंघात ६३ ठिकाणी एकाच दिवशी विविध उपक्रम राबवले गेले. रक्तदान, योग शिबिरे, महाआरती, फळवाटप, वक्तृत्व स्पर्धा, रोजगार मेळावा – ही केवळ कार्यक्रमांची यादी नाही, तर समाजासाठी आणि नागरिकांसाठी आपली कृतिशील बांधिलकी व्यक्त करण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व विभागांनी परिश्रम घेतले, असेही त्यांनी नमूद केले.
रोजगार मेळाव्यात दीड हजार युवकांची नोंदणी
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह निमित्त सरदार पटेल विद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागपूर आणि चंद्रपूर येथील एकूण १७ कंपन्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सुमारे १५०० युवकांनी नोंदणी केली असून, अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.