आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
आसोलामेंढा कालव्याच्या मुख्य द्वारातून ४ क्यूसेक विसर्ग सुरू ; शेतकऱ्यांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आसोलामेंढा कालव्याच्या मुख्य द्वारातून ४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुल, चिमूर, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपीपरी आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकासाठी तातडीने सिंचनाचा आधार मिळणार आहे.
पाऊस कमी प्रमाण पडल्यामुळे धान पिकांवर संकट निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना धान पिकासाठी लागणाऱ्या सिंचनाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली. धान पीक वाचवण्यासाठी गोसिखुर्द प्रकल्पातील तलावातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी त्यांनी गोसिखुर्द प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे केली होती.
धान पिकांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक होते, अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर गोसिखुर्द प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंत्यांनी त्वरीत दखल घेत १९ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आसोलामेंढा कालव्याच्या मुख्य द्वारातून ४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत