जिवतीच्या शेतकऱ्यांना जमिनीचा पट्टा मिळणार !
आमदार भोंगळेंच्या भावनिक सादेला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आकांक्षित तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.१५ जुलै २०२५ रोजी मंगळवारी मुंबईतील विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघ आणि जिवती तालुक्यातील वन जमिनीच्या प्रश्नांवर आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने आढावा बैठक घेतली.या बैठकीत ८६५९.८ हेक्टर जमिनीच्या वनक्षेत्र वर्गीकरणात तत्काळ वगळण्याचे आदेश करण्याचे निर्देश दिले.यामध्ये १९८० पुर्वीच्या ६२६० हेक्टर जमीन आणि १९८०-९६ दरम्यानच्या २६५० हेक्टर जमिनीचा समावेश आहे.या जमिनीच्या वर्गीकरण दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी यांनी वनविभागाव्दारे महसूल विभागाला प्रस्ताव सादर केलेला आहे.हे प्रस्ताव वन संवर्धन कायद्याअंतर्गत केंद्रीय सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.मंजुरी मिळाल्यानंतर जिवती तालुक्यातील
जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
जिवती तालुक्यातील ८३ गावांमध्ये ७० हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. येथील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. मात्र, अनेक पिढ्यांपासून शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. या प्रश्नावर राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भावनिक साद घालताना म्हटले, “जर आपण जिवतीच्या शेतकऱ्यांना जमिनीचा पट्टा मिळवून दिलात, तर येथील घरोघरी तुमचे फोटो लावून पूजा केली जाईल.”आमदार भोंगळे यांच्या या भावनिक आवाहनाने मुख्यमंत्रीही भारावून गेले. त्यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले, “माझा फोटो लावण्याची गरज नाही, पण जिवतीच्या शेतकऱ्यांना जमिनीचा पट्टा मिळवून देण्यासाठी लवकरच योग्य पावले उचलली जातील.” हे आश्वासन नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले यामुळे जिवतीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.जमिनीचा मालकी हक्क मिळाल्यास येथील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रखडलेले सिंचन तलावांची कामे मार्गी लागणार
जिवती तालुक्यातील रखडलेल्या सिंचन तलावांच्या कामांना लवकरच गती मिळणार आहे.संपूर्ण जिवती तालुका वनक्षेत्र घोषित झाल्याने गेल्या १० वर्षांपासून (२०१५ पासून) रखडलेला जिवती, गुडसेला आणि कोदेपूर येथील सिंचन तलावांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला घेत
सिंचन तलावांच्या कामांसाठीचा निधी वनविभागाला वळता करावा, असा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे रखडलेली तलावांची कामे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे.
हा निर्णय स्थानिक शेतकऱ्यांसाठी आणि परिसराच्या विकासासाठी एक मोठी सकारात्मक पायरी ठरणार आहे.