महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास चालना मिळू लागली.
१९ जुलैला देखील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पद्धतीची सखोल माहिती देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सुदाम हरी राठोड, पोलिस कर्मचारी, गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीविषयी मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून पोलिस भरती, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. संविधान या विषयावर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी प्रा. आशिष देरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रदीप परसुटकर व प्रा. नरेंद्र हेपट यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र हेपट यांनी केले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबतची भीती दूर होऊन नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.