ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर मनपामार्फत 161 दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, त्यामध्ये दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत शिष्यवृत्ती योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता शिक्षण घेत असलेल्या 161 दिव्यांग विद्यार्थ्यांना मनपामार्फत वार्षिक शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे.

   यात इयत्ता 1 ते 8 वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये, इयत्ता 9 ते 12 साठी 10 हजार रुपये,डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर (BA, BCom, BSc, पॉलिटेक्निक) करणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये तर व्यावसायिक शिक्षण जसे इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

   शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता इयत्ता 1 ते 8 मधील 119 विद्यार्थी, इयत्ता 9 ते 12 मधील 37 विद्यार्थी,डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर करणाऱ्या 4 तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या 1 अश्या 161 दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी शिष्यवृत्तीच्या रूपाने वितरित करण्यात आला आहे.यासाठी 40% किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व ही पात्रता मानण्यात येते. सर्व शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातुन मनपाच्या शहर प्रकल्प अधिकारी यांच्याकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्यात येतात.

   ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देणारी असून त्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. यापुढे देखील चंद्रपूर महानगरपालिका समाजातील सर्व घटकांसाठी समावेशी आणि कल्याणकारी योजना राबविण्यास वचनबद्ध आहे.अधिक माहितीसाठी दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान कार्यालय, बी.पी.एल. ऑफीस, ज्युबली हायस्कुल समोर येथे संपर्क साधता येईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये