आद्य सरसंघचालकांचे प्रतिरूप आज चंद्रपुरात अवतरणार – युग प्रवर्तक महानाट्य दाखवणार डॉ. हेडगेवारांचा जीवनपट
आमदार सुधीर मुनगंटीवारांची अनोखी गुरुदक्षिणा - सर्वांसाठी निःशुल्क प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
1925 साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांनी हिंदूंचे एकत्रीकरण, राष्ट्राचे बळकटीकरण व त्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला सहकार्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाला सोडुन निष्ठावान, चारित्र्यसंपन्न, निस्वार्थ तसेच निरपेक्ष वृत्तीने राष्ट्रकार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या स्वयंसेवकांचे संघटन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रुपी रोपटे लावले, ते रोपटे रुजवले ज्याचा आज वटवृक्ष तयार झाला असुन ह्या घटनेला यंदा शताब्दी पुर्ण होत आहेत.
ह्या राष्ट्रकार्याचे बीजारोपण करणाऱ्या आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या ह्या संघटनेला आता शंभर वर्ष पूर्ण होत असुन कुठलेही राजकीय पाठबळ अथवा पैशांचा शाश्वत स्रोत नसलेली संघटना अशी किती काळ टिकेल? असा समज असलेल्या लोकांना केवळ समर्पित भावनेने निष्ठापूर्वक कार्य करणारे स्वयंसेवक असल्यावर संघटना शतकोत्तर वर्षात पदार्पण करणार असल्याचे बघुन आश्चर्य होते.
देशासाठी शहीद होणे ही निःसंशयपणे एक सन्माननीय आणि इष्ट गोष्ट आहे, परंतु त्याहूनही कठीण म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पित करणे, तो राष्ट्राला समर्पित करणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. डॉ हेडगेवारांचे विचार आजही किती प्रासंगिक आहेत हे जाणून घेण्यासाठी नादब्रह्म निर्मित युगप्रवर्तक डॉ हेडगेवार हे महानाट्य बघायला मिळणे हा देवदुर्लभ क्षण असुन आमदार सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या पुढाकाराने तसेच त्यांच्या संघाप्रती असलेल्या निष्ठेमुळे चंद्रपूरकरांना भाग्य आज शनिवार दिनांक 19 जुलै रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात सायंकाळी 6 वाजता लाभणार आहे. सदर नाट्यप्रयोग सर्वांसाठी निःशुल्क असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे अवाहन नाट्य लेखक डॉ अजय प्रधान यांनी केले आहे. डॉ प्रधान म्हणाले, जेव्हा जग भौतिकवादाच्या शिखरावर आहे आणि निराश होत आहे, तेव्हा आपल्याला मानवतेच्या मूल्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल. भारतमातेच्या सर्व सुपुत्रांनी हे नाटक पाहिले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे. जर तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित केला तर आम्हाला विश्वास आहे की आमची मातृभूमी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.