उघडयावर मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध मनपाची पोलिसात तक्रार

चांदा ब्लास्ट
शहरात बेकायदेशीरपणे मांस विक्री करणाऱ्यांवर मनपाने कारवाईचा बडगा उगारला असून, नागपूर रोडवर उघड्यावर बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मनपाचे अतिक्रमण कर्मचारी शक्ती हटवार यांच्या मार्फत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मनपाचे उपद्रव शोध पथक १४ जुलै रोजी झोन क्र. १ अंतर्गत नागपूर रोडवर गस्त घालत होते. येथे बेस्ट कार डील्स परिसरात रोडलगत असलम शेख मुसा,विक्री विसटकर,रफिक शेख,फारुख शेख या ४ व्यक्ती अउघड्यावर बेकायदेशीरपणे मांस विक्री करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांना मांस विक्री परवाना, तसेच कत्तल खाण्यात बकरे कत्तल केल्यानंतर देण्यात येणाऱ्या पावतीबाबत विचारणा केली. दोन्हीही बाबी नसल्याचे समजताच बेकायदेशीरपणे मांस विक्री व मटण दुकानात अवैध कत्तल करून निरुपयोगी अवयव परिसरात फेकून दुर्गंधी पसरविल्याबद्दल संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सामान जप्त करून दुकान काढण्यात आले आहे.
उघड्यावर मांस विक्री होत असल्याने दुर्गंधी निर्माण होते व धुळ,माश्या बसुन नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो.मांसविक्री केल्यानंतर घाण तेथेच टाकली जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिली होते त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली असुन यापुढेही कारवाई केली जाणार आहे.