मनपा आरोग्य विभागामार्फत शाळांमध्ये डेंग्यू विषयी जनजागृती
मनपातर्फे घरोघरी कंटेनर सर्वे

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू प्रतिरोधक मोहीम पुर्ण क्षमतेने राबविली जात असुन शासकीय तसेच खाजगी शाळांमध्ये मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत डेंग्यू विषयी जनजागृती केली जात आहे.
या जनजागृतीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शालेय विद्यार्थी व पर्यायाने सर्व घरी कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यात येत असुन गप्पी मासे हे डेंग्यूवर कसे प्रभावी ठरतात याचे प्रात्यक्षिक आरोग्य बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांमार्फत दाखविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डेंग्यू कसा पसरतो, त्याची लक्षणे कोणती, आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल माहिती दिली जाते. तसेच, शाळांमध्ये डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, याबाबत मार्गदर्शन केले जाते.आठवड्यातुन एक दिवस पालकांच्या मदतीने पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे ही सर्व कार्ये पालकांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन केले जात आहे.
28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे,घरातील कूलर,टायर,कुंड्या खालील प्लेट,फ्रीज खालील ट्रे,पाण्याचे ड्रम, फिश टँक, एसीचे पाणी पडणारे कंटेनर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी डासांच्या उगमस्थानांची तपासणी केली जात आहे. स्वच्छता विभागामार्फत आठवड्यातुन एकदा शहरात प्रत्येक जागी धुरळणी व फवारणी करण्यात येत आहे. गप्पी मासे प्रजनन केंद्रांची निर्मिती करण्यात येऊन पाणी साचलेल्या जागी गप्पी मासे सोडणे अथवा प्रतिबंधात्मक द्रावण सोडण्यात येत आहे.
डासांमुळे निर्माण होणारे रोग हे धोकादायक ठरू शकत असल्याने आवश्यक ती काळजी घेण्याचे तसेच मनपास सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
डासांची उगमस्थाने –
पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, फ्रिज, फिश पॉट,भंगारातील वस्तु,डबे,स्वच्छ परंतु अनेक दिवसांपासुन जमा असलेले पाणी इत्यादी ठिकाणे डासांची उगमस्थाने आहेत.
डेंग्युची लक्षणे –
डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –
डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.