ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आझाद हिंद सेनेचा स्थापना दिन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून साजरा व्हावा _ डॉ. रवींद्र मर्दाने

वरोरा येथे आझाद हिंद सेनेचा ८२ वा वर्धापन दिन सोत्साह साजरा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

वरोरा : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी भूमिकेमुळेच देशाला लवकर स्वातंत्र्य मिळाल्याने कृतज्ञता म्हणून आझाद हिंद सेनेचा २१ ऑक्टोबर हा स्थापना दिन दरवर्षी लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून साजरा करण्यात यावा, ही आमच्या संस्थेची प्रमुख मागणी असल्याचे प्रतिपादन जय हिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. रवींद्र मर्दाने यांनी येथे केले. शहीद योगेश डाहुले चौकात आझाद हिंद सेनेचा ८२ वा वर्धापनदिन जय हिंद सैनिक संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने सोत्साह साजरा करण्यात आला.त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

     व्यासपीठावर प्रख्यात चित्रकार प्रल्हाद ठक, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोभाटे व सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश राजूरकर उपस्थित होते.

      डॉ. मर्दाने यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत जीवनकार्याचा नेटक्या शब्दात आढावा घेतला. ते म्हणाले की, नेताजींनी सिंगापूर येथे अंतरिम सरकार स्थापन केले होते व ते स्वतः राष्ट्रपती, प्रधानमंत्री, युद्धमंत्री व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते.जर्मनीचे एडॉल्फ हिटलर, इटलीचे मुसोलिनी, जपानचे पंतप्रधान तोजो अशा महनीय व्यक्तीची भेट घेऊन नऊ देशांचा पाठिंबा त्यांनी मिळवला होता. म. गांधी,पं. नेहरू, डॉ. आंबेडकर अशा दिग्गज नेत्यांच्या भेटी घेऊन आपली भूमिका स्पष्ट करीत त्यांचा पाठिंबा मिळविण्याचाही त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. म. गांधींशी मतभेद झाल्यावरही त्यांनीच त्यांना प्रथम ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले आणि गांधीजींनीही त्यांना ‘ देशभक्तांचे देशभक्त ‘ म्हणून संबोधल्याचे त्यांनी नमूद केले. टोकियोच्या रेनकोजी बौद्ध विहारात त्यांच्या अस्थी ठेवल्याचे जे म्हंटले जाते त्याची शहानिशा करण्यासाठी भारत सरकारने त्या आणून डीएनए चाचणी करावी, त्यांची जयंती सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साजरी करणे अनिवार्य करावे, असेही ते म्हणाले. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळात जाऊन समुपदेशन करावे, आपापल्या परीने शक्य ती मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, समाजासमाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत राष्ट्रीय एकता, एकात्मता व अखंडतेचे रक्षण करावे, असा सल्ला त्यांनी एक शेर पेश करीत देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

 *नेताजींच्या स्मृती जागविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम – डॉ. राजूरकर*

          डॉ. राजूरकर यांनी “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा”, या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आझाद हिंद सेनेचा धसका इंग्रजांनी कसा घेतला.

हे सोदाहरण स्पष्ट करीत नेताजींच्या स्मृती जागविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रशंसोद्गार काढले.

   *२१ ऑक्टोंबर तरुणासाठी प्रेरणादायी दिवस – प्रल्हाद ठक*

       चित्रकार ठक म्हणाले की, नागरिकांमध्ये आणि विशेषतः नवयुवकांमध्ये राष्ट्रभक्तीचा अभाव जाणवल्याने मी स्वरक्ताने क्रांतिकारकांची चित्रे रेखाटण्याचे आणि भारतभर त्याची प्रदर्शने भरविण्याचे व्रत घेतले. देशभक्तीचा जागर निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी मांडले.

          कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर शहीद योगेश डाहुले यांच्या स्मारकाला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी डॉ. रवींद्र मर्दाने यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि नेताजींना मानवंदना देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

       सदर कार्यक्रम जय हिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक चंद्रमोहन बोस, राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने आणि राष्ट्रीय सचिव जनार्दन जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश बोभाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. आभार संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी मानले. कार्यक्रमाला वसंतराव डाहुले, माजी सैनिक ऋषी मडावी,वसंतराव काकडे, अरविंद चौधरी, धनंजयसिंग, विठ्ठल खोंडे, देवराव राऊत, सहारे, जय हिंद सैनिक संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने, जिल्हा उपाध्यक्ष सागर कोहळे, पदाधिकारी सदस्य विजय वैद्य, गजानन उमरे, भारत पातालबंसी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहाणे, राहुल देवडे, भास्कर गोल्हर, सुरेश महाजन, संतोष पवार, विवेक बर्वे, सरदारसिंग मर्दाने, संजू राम, तुषार मर्दाने, अनिरुद्ध व श्रीमयी मुधोळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये