चंद्रपूर जिल्ह्यातील कलावंतांना एका व्यासपीठावर आणून भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करा — आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
भौतिक विकासाबरोबरच मानसिक आणि सांस्कृतिक विकास महत्त्वाचा : चंद्रपूर येथे 'पाडवा पहाट' थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्ह्यात असंख्य प्रतिभावान कलावंत आहे. या सर्वांना एका व्यासपीठावर आणून आपल्या जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा अधिक तेजस्वी आणि समृद्ध करावा, असे प्रेरणादायी आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
संस्कृती संवर्धन मंडळाचा वतीने आझाद गार्डन येथे आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग, शैलेश परबते, विजय चंदावार, गणपतराव येवले, नम्रता आचार्य-ठेमस्कर, सूर्य खजांची, रवी लोणकर, धनराज कोवे, डॉ. अशोक वासलवार,डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. विलास मुळे,गोपाल मुंदडा, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. भूपेश भलमे, डॉ. राहुल तपासे, डॉ. सलीम तुकडी, प्रलय सरकार, अमित निरंजने, निलेश काळे, उमेश आष्टणकर, सचिन कोतपल्लीवर,मुग्धा खांडे, पुरुषोत्तम सहारे, चांद पाशा, माया उईके, शिला चव्हाण, सुनील डोंगरे आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, दीपावली सण हा उत्सवांचा राजा असून तो आनंद, ऐक्य आणि प्रकाशाचा सर्वोच्च प्रतीक आहे. संस्कृती संवर्धन मंडळ समाजात “हम साथ साथ हैं” या भावनेचा प्रसार करत आहे. गावांमध्ये भौतिक विकासाबरोबरच संस्कृती, मूल्य आणि मनोविकासालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा जगासाठी प्रेरणादायी ठरली असून, परदेशांतही गणेशोत्सव साजरा केला जातो, हे संस्कृतीची ताकद आणि जागतिक ओळख दर्शवते.
सांस्कृतिक तेजाची नवी पहाट, चंद्रपूरचा अभिमान:
डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या दिवाळीपासून एक सुंदर आणि महत्वपूर्ण उपक्रमाला सुरुवात केली.दीपावलीच्या पावन पर्वावर कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून यशाची खात्री झाली. एकेकाळी लोकपूर म्हणून ओळखले जाणारे चंद्रपूर आज उत्साह, संस्कृती आणि सहनशीलतेसाठी ओळखले जाते. जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण ‘सूर्यपूर’ या नावाने नाही तर चंद्रपूर या नावानेच ओळखले जाते. चंद्रपूरकरांच्या सहनशीलतेला संस्कृतीची जोड देत सांस्कृतिक तेज आणि सामाजिक ऐक्याने शहर उजळवूया, हीच या नव्या उपक्रमाची खरी प्रेरणा असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूरची कला गंगासागराच्या रूपात पाहायला मिळेल:
तणावात नव्हे, तर आनंदात जगायला शिका, हा संदेश या कार्यक्रमातून उमटला. संस्कृती संवर्धन मंडळाने चंद्रपूरमधील सर्व कलाकारांची नोंद करून पुढील दीपावलीपर्यंत “हम हे चंद्रपूरकर” या भावनेतून एकत्र येऊन हजारो कलाकारांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम साकारण्याचा संकल्प करावा. आजची ही सुरुवात गंगोत्रीसारखी आहे; जशी गंगा प्रवाहित होऊन गंगासागरात मिळते, तशीच संस्कृती आणि कलाकारांच्या कलेची गंगा एक दिवस चांदा क्लब मैदानावर गंगासागराच्या रूपात अवतरलेली पाहायला मिळेल, हा विश्वास या कार्यक्रमाने दिला असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.