आपत्ती व्यवस्थापनासाठी ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सज्ज – तहसीलदार सतीश मासाळ

चांदा ब्लास्ट
ब्रम्हपुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवार, दिनांक 07 जुलै 2025 रोजी 108 मिमी तर 08 जुलै रोजी 162 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील काही मुख्य रस्ते व महामार्ग पाण्याखाली गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांसाठी सज्जता दर्शवली असून, आज तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, तहसीलदार ब्रम्हपुरी, गटविकास अधिकारी पं.स. ब्रम्हपुरी, कार्यकारी अभियंता (गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्र. 07), पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उपविभागीय अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) हे उपस्थित होते.
बाधित रस्ते व महामार्ग: ब्रम्हपुरी – वडसा महामार्ग,आवळगाव – गांगलवाडी, कन्हाळगाव – ब्रम्हपुरी, ब्रम्हपुरी – चांदगाव, दुधवाही – ब्रम्हपुरी व पारडगाव – ब्रम्हपुरी
गोसीखुर्द धरणातील विसर्ग: धरणातून सध्या 13,000 क्युसेक मीटर विसर्ग सुरू असून पुढील मुसळधार पावसामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख उपाययोजना: राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात, पूरप्रभावित गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी. तालुका नियंत्रण कक्ष स्थापन – दूरध्वनी क्रमांक: 07177-272073, कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी यांची दक्षता पथके गठीत. सर्व गावांमध्ये पूर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी कळविले आहे.