म्हातारदेवी ग्रामपंचायतीत कारभार ठप्प
ग्रामसेवक बदलण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) – चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या शेनगाव येथील ग्रामसेवक चहारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कारण प्रभारी ग्रामसेवक सतिश मुनगंटीवार आजारी असल्याने ते कामावर अनुपस्थित आहेत. मात्र प्रभारी ग्रामसेवक हे कोणतेही काम योग्य पद्धतीने करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीमार्फत होणारी अनेक कामे थांबलेली आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ग्रामसेवक बदलण्याची जोरदार मागणी केली आहे. यासाठी बंडू बरडे यांनी संर्वग विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी अनेक ग्रामस्थही त्यांच्या सोबत उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सांगितले की, सध्याच्या प्रभारी ग्रामसेवकाकडून कोणतेही काम वेळेवर होत नसल्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.