कामावर असताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नातेवाईकांचा आर्थिक मदतीसाठी कंपनीसमोर ठिय्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
१६ लाखांची मदत व नोकरीचा निर्णय
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवाळपूर युनिटमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. सुभाष फुलचंद शेंडे (३५), रा. गणेश नगर, नांदा हे प्रेरणा कॉन्ट्रॅक्टरमार्फत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असताना अचानक सीसीआर कॅन्टीनजवळ चक्कर येऊन खाली कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने ॲम्बुलन्स बोलावून त्यांना कंपनीच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने चंद्रपूर येथील बुक्कावार हॉस्पिटल व नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले.
कामावर असताना मृत्यू झाल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी तातडीने आर्थिक मदत व एका नोकरीची मागणी केली. यासाठी त्यांनी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत ठिय्या आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे कंपनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने कामगार जमा झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त ठेवत बाहेरील व्यक्तींना कंपनीत प्रवेश दिला नव्हता.
समजोत्याने आंदोलनावर पडला पडदा
एल अँड टी कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या माध्यमातून कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग प्रमुख श्रीराम पी. एस. यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन व मृतक कुटुंबीयांमध्ये चर्चा होऊन रात्री उशिरा समजोत झाला. यावेळी आशिष देरकर, अभय मुनोत, प्रकाश बोरकर, हारुन सिद्दीकी, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रात्री ११.३० वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
१६ लाखांची मदत व एक नोकरी
या आंदोलनानंतर मृतकाच्या कुटुंबीयांना एकूण १६ लाखांची मदत व एका सदस्याला नोकरी देण्याचे ठरले.
१५ लाखांचा धनादेश मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आला.
१ लाखाचा धनादेश अंत्यविधी खर्चासाठी देण्यात आला.
दवाखान्यातील संपूर्ण खर्च कंपनीने उचलला.
तसेच सप्लाय विभागात कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्यात येणार आहे.
पीएफ व विमा मिळून ४ ते ५ लाख रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. त्यामुळे कुटुंबास सुमारे २० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.