चंद्रपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढून १.९० लाख क्विंटल
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठादिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यासाठी यापूर्वी केवळ ९०,६८० क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आता यामध्ये तब्बल एक लाख क्विंटल वाढ करून एकूण १,९०,६८० क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी खरेदी फेडरेशनकडे सविस्तर पत्राद्वारे मागणी केली होती.
या पत्रांमध्ये Beam पोर्टलवरील शेतकरी नोंदणी, जिल्ह्यातील गरज, आणि शेतकऱ्यांचे नुकसान यांचा तपशीलवार आढावा देण्यात आला होता. या ठोस मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आता वाढीव उद्दिष्टाचा थेट लाभ होणार आहे.
ही उद्दिष्टवाढ केवळ प्रशासनिक प्रक्रिया नसून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या शेतकरीहिताच्या संघर्षाचे ठोस फलित आहे.यामुळे आता अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराने आपले धान विक्री करता येणार असून त्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम पाठपुरावा आणि शासन दरबारी प्रभावी मांडणी यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आज दिलासा मिळाला आहे, हे विशेष.