चंद्रपूरातील तीन नेत्यांची भाजप राज्य परिषद सदस्यपदी निवड
ही निवड कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान - आ. किशोर जोरगेवार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषद सदस्यपदी राजेंद्र गांधी, तुषार सोम आणि राखी कंचर्लावार यांची निवड झाल्याने चंद्रपूर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच या समितीवर चंद्रपूरच्या तीन कार्यकर्त्यांना स्थान मिळाले आहे.
या निवडीबाबत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, राज्य परिषदेसाठी प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील तिघा कार्यकर्त्यांना एकाचवेळी संधी मिळाली आहे, ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायक बाब आहे. ही निवड पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि सामाजिक भान या मूल्यांवर आधारित कार्याचा सन्मान आहे. पक्षाच्या विविध स्तरांवरील योगदानामुळेच आज राज्याच्या या महत्त्वाच्या विचारमंचावर आपल्याला प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे. ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठीही गौरवाची आणि प्रेरणादायक बाब आहे.
आमदार जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, राजेंद्र गांधी हे पक्षाशी दीर्घकाळ निष्ठावान राहिले असून, त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. राखी कंचर्लावार यांनी चंद्रपूरच्या महापौरपदी कार्यरत असताना शहराच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले. तर तुषार सोम यांनी शहराध्यक्ष म्हणून संघटना मजबूत करण्याचे काम केले होते.
नव्या नेतृत्वामुळे पक्षात नव्या संघटन पर्वाची सुरुवात झाल्याचे सांगून आमदार जोरगेवार म्हणाले, “नवीन महानगर अध्यक्ष, सहा मंडळ अध्यक्ष आणि आता राज्य परिषद सदस्य अशा स्वरूपात भाजप संघटना अधिक बळकट होत आहे. या नव्या संघटन पर्वात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी एकजुटीने काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनीही ही निवड चंद्रपूर भाजप कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले. या तिघांचा अनुभव आणि नेतृत्वगुण राज्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरतील, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर भाजप महानगरतर्फे राजेंद्र गांधी, तुषार सोम आणि राखी कंचर्लावार यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहे.
संजय तिवारी यांची घुघ्घुस शहर अध्यक्षपदी निवड
भारतीय जनता पक्षात संघटनात्मक मोठे बदल करण्यात येत असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी संजय तिवारी यांची घुघ्घुस शहर अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे.
घुघ्घुस येथील एका कार्यक्रमात वेकोली कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी घुघ्घुस शहर अध्यक्षपदी संजय तिवारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.