घोडपेठ – कोंढाळी – गोरजा मार्गाची दुरवस्था
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ – कोंढाळी – गोरजा मुख्य मार्गाची दुरवस्था होत चालली आहे. विशेषतः पावसाळ्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हा मार्ग गोरजा वासियांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. घोडपेठ, कोंढाळी आणि गोरजा परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. अनेक शेतकरी आपले शेतमाल गावातील बाजारात विक्रीसाठी या मार्गाने नेतात. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था आणि पावसामुळे झालेली चिखलवाट यामुळे वाहनांना सैरभैर होण्याची वेळ येत आहे. दुचाकीस्वार आणि शाळा-कॉलेजांना जाणारे विद्यार्थी देखील अपघाताच्या धोक्यात आहेत.
या रस्त्यावरील कोंढाळी गावाजवळ रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले असून यामुळे चारचाकी वाहन या रस्त्यावरून चालवणे धोकादायक झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यामुळे खड्डे दिसत नाहीत आणि वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे.
या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, खड्डे बुजवावे आणी पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक असून, नागरिकांचा होणारा त्रास त्वरित थांबवणे गरजेचे आहे.