धनोजे कुणबी समाज मंदिरात गुणवंत सत्कार
विद्यार्थ्यांनी आवडीनुसार करिअर निवडावे - डॉ. प्रतिभा जीवतोडे

चांदा ब्लास्ट
‘यशाची गुरुकिल्ली’ या पुरवणीचे प्रकाशन
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी संस्कारी होणे आवश्यक आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत असले तरी पालकांनीही आपल्या मुलाच्या संस्काराकडे लक्ष द्यावे. याशिवाय विद्यार्थ्यांनी आपली आवड विचारात घेऊन करिअर निवडावे. एकदा करिअर निवडल्यानंतर त्यानुरूप आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा अशोक जीवतोडे यांनी धनोजे कुणबी समाज मंडळ लक्ष्मीनगर, चंद्रपूर येथे आयोजित गुणवंत सत्कार सोहळ्यात व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नुकताच विद्यार्थी, शेतकरी, पीएचडीधारक तसेच इतर क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या समाजबांधवांचा सत्कार सोहळा नुकताच कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड . पुरुषोत्तम सातपुते यांच्या हस्ते उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटक चांदा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा अशोक जीवतोडे तर मुख्य अतिथी उद्योजक संजय ढवस, सुलोचना बल्की तसेच मुख्य मार्गदर्शक एनडीए प्रशिक्षित प्रद्युमन गुरव, प्रा. डॉ. मनीष मत्ते, कौन्सिलर निर्वेध सुटे उपस्थित होते. अतिथींमध्ये मंडळाचे सल्लागार मनोहर पाहुणकर, मंडळाचे सचिव अतुल देऊळकर, सहसचिव नामदेव मोरे, उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सदस्य महेश खंगार डॉ. मीना माथनकर, भाऊराव झाडे उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शनात गुरव यांनी एनडीए संदर्भातील अभ्यासक्रम प्रशिक्षण व परीक्षा आदी संदर्भात मार्गदर्शन तर प्रा. डॉ. मत्ते यांनी कला व विज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांनी स्वबळावर करिअरच्या वाटा शोधाव्या व स्वतः आवडीनुसार करिअर करावे. जेणेकरून भविष्यात चिंता करण्याची गरज नसल्याचे मत मांडले. कौन्सिलर सुटे यांनी विदेशातील शिक्षण व सोयीसुविधा, शिष्यवृत्ती यावर प्रकाश टाकला तर संजय ढवस यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचा सल्ला दिला.
याशिवाय धनोजे कुणबी समाज मंडळाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी गुणवंतांना स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे स्मृतिप्रीत्यर्थ जनता करिअर लॉन्चर तर्फे तर सुलोचना बल्की यांच्या तर्फे स्व. सखाराम रघू बल्की यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक देण्यात आले.
यावेळी यशाची गुरुकिल्ली पुरवणी काढल्याबद्दल दीपक गिरसावळे तर महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कामगार पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल किसन नागरकर व मारोती पिंपळशेंडे यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत शेतकरी म्हणून हरिश्चंद्र बोढे, गजानन जुनघरी, धोंडीराम पिंपळशेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अँड. सातपुते यांनी समाजबांधवांनी मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नामदेव मोरे व कवयित्री सविता कोट्टी यांनी केले. प्रास्ताविक सुधाकर जोगी तर आभारप्रदर्शन अँड. विलास माथनकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गुणवंत विद्यार्थी व समाजबांधव उपस्थित होते.