बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा – आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूरला घरकुल योजनेत राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार

चांदा ब्लास्ट
घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक : विविध अडचणींवर चर्चा
बल्लारपूर मतदारसंघातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई, शबरी, घरकुल योजना तसेच इतर राज्यस्तरीय योजनांच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुनियोजित व्हावी, तसेच बल्लारपूर मतदारसंघ घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा, यासाठी प्रभावी व समन्वयाने कार्य करा, अशा सूचना राज्याचे माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या
बल्लारपूर मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर येथे आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष रणंजय सिंग,सतीश कणकम,उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार (बल्लारपूर) रेणूका कोकाटे, तहसीलदार (मुल) मृदूला मोरे, बल्लारपूरचे न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, संदीप दोडे(मुल), निखिल लांडगे (पोंभुर्णा), संवर्ग विकास अधिकारी (चंद्रपूर) संगीता भांगरे, धनंजय साळवे (बल्लारपुर), विवेक बेलालवार (पोंभुर्णा), अरुण चनकणे (मुल), बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या हजारो लाभार्थ्यांना भेडसावत असलेल्या निधीचा विलंब, तांत्रिक अडचणी, अपूर्ण बांधकाम व जागेच्या समस्यांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून घरकुलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, मतदारसंघातील घरकुल कोणत्या कारणाने अपूर्ण आहेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी. वडिलांच्या नावाने घरकुल मंजूर झाले असले, तरी ते वयस्कर असल्यामुळे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे मुलाचे जातीचे प्रमाणपत्र व तत्सम कागदपत्रांच्या आधारे घरकुल मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. शबरी आवास तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेंबाबत संबंधित संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात यावी. विशेषतः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेत लाभार्थी संख्या कमी असूनही मंजुरी संख्या अधिक असल्यामुळे या विषयावर आढावा बैठक आयोजित करण्यात यावी.
ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत जागा खरेदी करून देण्यात यावी. या खरेदीसाठी संबंधित ग्रामपंचायतीला आवश्यक निधी उपलब्ध करून देता येईल. यासोबतच यशवंतराव मुक्त वसाहत योजनेसंदर्भातही लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत बल्लारपूर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर राहावा, यादृष्टीने प्रभावी व समन्वयात्मक कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.