वृक्षदिंडी काढून केली वसुंधरेची जनजागृती
बिबी गावाचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे आज दि. ५ ला पर्यावरण रक्षणासाठी अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत बिबी यांच्या पुढाकाराने माझी वसुंधरा अभियान ६ अंतर्गत गावात भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.
या वृक्षदिंडीत महिला डोक्यावर वृक्षांच्या कुंड्या घेऊन पारंपरिक भजनात दंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारुड भजन मंडळे, शाळेतील विद्यार्थी, अंगणवाड्यांतील बालके, ग्रामवासी, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण व वृक्षांचे महत्त्व सांगणारे नारे दिले, तर महिलांनी पारंपरिक गीतांमधून निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी अंगणवाड्यांतील लहान मुलांनी देखील रंगीबेरंगी फलक घेऊन रैलीत भाग घेतला.
गावातील रस्त्यांवरून ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वृक्ष वाचवा, पृथ्वी वाचवा’ अशा गगनभेदी घोषणा देत निघालेली ही वृक्षदिंडी लक्षवेधी ठरली.
ग्रामपंचायत बिबीने नेहमीच स्वच्छता, पाणी व वृक्षसंवर्धन यासारख्या उपक्रमांतून आदर्श निर्माण केला असून, आजची ही वृक्षदिंडी बिबी गावच्या पर्यावरण प्रेमाचे उत्तम उदाहरण ठरली.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. “पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावावा व जगवावा,” असा संदेश यावेळी देण्यात आला.