ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

राप्तीसागर एक्सप्रेस थोडक्यात बचावली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    त्रिवेंद्रमहून गोरखपूरकडे जाणारी राप्तीसागर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२५१२) एका भीषण अपघाताच्या उंबरठ्यावर असतानाच, माजरी जंक्शनजवळ गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी दुपारी १. ५१ वाजताच्या सुमारास घडली.

माजरी जंक्शनजवळील रेल्वे पोल क्रमांक ८४१ बी/२१ ए ते ८४१ बी/१९ दरम्यान रेल्वे पटरीचा एक भाग तुटलेला आढळून आला. गस्तीदरम्यान गँगमनला हे लक्षात आले. प्रसंगावधान राखत त्याने तात्काळ रेड फ्लॅग लावून येणाऱ्या राप्तीसागर एक्सप्रेसला थांबवले. त्याच्या वेळीच दिलेल्या इशाऱ्यामुळे ट्रेन थांबवण्यात यश आले आणि सुमारे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

दरम्यान रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तुटलेल्या पटरीची दुरुस्ती केली. आवश्यक सर्व तपासण्या करून राप्तीसागर एक्सप्रेसला सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

गँगमनच्या सावधपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र वेळेवर गस्ती होत नसती किंवा गँगमनने इंजिन ड्रायव्हरला तत्काळ इशारा दिला नसता, तर प्रचंड जीवितहानी झाली असती. या प्रकारामुळे रेल्वेच्या देखभाल व्यवस्थेतील त्रुटी व दुर्लक्ष स्पष्टपणे समोर आले आहे.

दररोज हजारो प्रवासी रेल्वेवर अवलंबून असताना, अशा प्रकारच्या सुरक्षा त्रुटी गंभीर चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. संबंधित विभागांकडून नियमित तपासणी व तांत्रिक देखभाल याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होऊ लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये