घुग्घुस-वणी-म्हातारदेवी मार्गावरील निर्माणाधीन पुलाचे काम ठरत आहे नागरिकांसाठी डोकेदुखी
वाहतूक कोंडीतून जनजीवन विस्कळीत

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर – सध्या घुग्घुस-वणी-म्हातारदेवी मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागात लहान-मोठ्या वाहनचालकांकडून “झुकेगा नहीं” या शैलीत होत असलेली मुजोरी आणि मनमानी यामुळे रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते आहे. यामध्ये वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असून सामान्य नागरिकांना तासन्तास जाममध्ये अडकून बसावे लागत आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण आणि आपत्कालीन सेवा यांना बसत आहे. वेळेवर आपल्या ठिकाणी पोहोचता न आल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास भोगावा लागत आहे.
या परिस्थितीबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घुग्घुस पोलीस, नगर परिषद, RTO चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांची या परिस्थितीकडे पूर्णतः उदासीन भूमिका दिसून येते. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते आहे. माध्यमं, सोशल मीडिया, निवेदनं आणि लेखी ज्ञापनांनंतरही अद्याप ठोस कृती झालेली नाही, ही बाब अधिक धक्कादायक आहे.
या मार्गाचा दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अन्य कोणताही मार्ग निवडण्याची मुभा नाही. परिणामी हा मार्गच अपयशी नियोजनाचा नमुना ठरत आहे आणि वाहतूक नियमांचा खुलेआम भंग इथे नित्याचाच झाला आहे.
हा प्रश्न केवळ ट्रॅफिक जामपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा, ठेकेदाराच्या कामकाजाच्या पद्धतीचा आणि राजकीय प्रतिनिधींच्या भूमिकेचा आरसा बनला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्थानिक आमदार, WCL आणि रेल्वे विभाग यांची या गंभीर प्रश्नावर भूमिका काय आहे? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. ही लोकांच्या संयमाची परीक्षा आहे की सरकारी व्यवस्थेची अपयशाची झलक?
नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की, संबंधित प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून कामास गती द्यावी, पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी व वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा संतप्त नागरिकांचा उद्रेक रस्त्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.