ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची गोंडवानाला बिनशर्त पाठिंब्याची तयारी

जिवती नगरपंचायतमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष दोन्ही पद गोंडवानाला देण्यास तयार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- अलीकडेच जिवती नगरपंचायत मध्ये राजकीय घडामोड होऊन काँग्रेस चे चार नगरसेवक आणि राष्ट्रवादी (श. प) चे तीन नगरसेवक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप चे सात आणि गोंडवाना चे पाच नगरसेवक यांनी मिळून विद्यमान नगराध्यक्षा कविता आडे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता आणि तो पारित झालेला आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे.

    त्यामुळे मोर्चेबांधणीस सुरुवात झालेली असून भाजप च्या गटात स्पर्धा सुरु झालेली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (श प) पक्षाने अतिशय निर्णायक भूमिका घेतली असून जर गोंडवाना पार्टी ने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केले तर दोघांनाही बिनशर्त मतदान करू आणि निवडून आणू अशी जाहीर घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता गोंडवाना पार्टी या संधीचा फायदा घेते की भाजप च्या खेळी ला बळी पडून भाजप चा अध्यक्ष बनवते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे गटनेते डॉ. अंकुश गोतावळे आणि राष्ट्रवादी (श प) चे गटनेते अमर राठोड यांनी सांगितले की आम्ही पाठिंब्याचे लेखी पत्र गोंडवाना च्या नेत्यांना आणि गटनेत्यास पाठवीत आहो. आणि तरीही जर गोंडवाना पक्षाने आपले उमेदवार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उभे केले नाही तर याचा अर्थ लोकं समजून घेतील अशी भूमिका दोन्ही गटनेत्यांनी मांडली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात गोंडवाना पार्टी सत्ता स्थापन करून महाराष्ट्र राज्यातील गोंडवाना पक्षाचा पहिला नगराध्यक्ष बनवतात का भाजप च्या मागे राहण्यात धन्यता मानतात हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आम्ही कसलीही अट शर्त न ठेवता गोंडवाना पार्टीस पाठींबा देण्यास तयार आहोत त्यामुळे गोंडवाना पार्टी ने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बनविण्याचा मार्ग मोकळा आहे.यावेळी गोंडवाना च्या नेत्यांचा मुत्सदीपणा सर्वांना समजेल आणि इथे जर ते चुकले तर यानंतर गोंडवाना पक्षाच्या जिवती मधील नेत्यांच्या राजकीय अस्तास सुरुवात होईल.

डॉ. अंकुश गोतावळे, तालुकाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी

राष्ट्रवादी ( श.प ) पक्ष गोंडवाना पार्टीस बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार आहे. त्यामुळे गोंडवाना चे पाच नगरसेवक,काँग्रेस चे दोन नगरसेवक आणि राष्ट्रवादी( श.प ) चे दोन नगरसेवक असे एकूण नऊ नगरसेवक होतात. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही गोंडवाना पक्षाचे होऊ शकतात.पण तरीही जर गोंडवाना ने अध्यक्ष स्वतःचा केला नाही तर लोकं काय समजायचं ते समजून घेतील.

कैलास राठोड, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी (श. प)

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये